03/09/2026
के. के. वाघ शैक्षणिक संकुल, सरस्वतीनगर परिसरात काही दिवसांपूर्वी टवाळखोरांचा वावर वाढल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल डहाके यांना माहिती देण्यात आली होती.
या बाबीची तातडीने दखल घेत म्हसरूळ पोलिसांनी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली. पोलिसांच्या या प्रभावी कारवाईमुळे परिसरातील टवाळखोरांचा त्रास कमी झाला असून विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील भीती कमी होऊन त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे.
म्हसरूळ पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे जनसंपर्क संचालक श्री. अजिंक्य बाळासाहेब वाघ, के. के. वाघ शैक्षणिक संकुल, सरस्वतीनगर कॅम्पसचे समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याला भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल डहाके यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी घेतलेल्या या तत्पर भूमिकेबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासन व शैक्षणिक संस्थेचा समन्वय कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.