07/01/2026
खतवड (ता. दिंडोरी) येथे म.वि.प्र. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हे शिबिर दिनांक ६ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाजाचे संचालक प्रवीण नाना जाधव होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, “स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर सर्वांगीण ज्ञानासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, तसेच त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित होतात. युवाशक्तीला नवचेतना देणारी ही योजना खऱ्या अर्थाने आदर्श विद्यार्थी घडविणारी एक युवा चळवळ आहे.”
युवकांकडून राष्ट्रसेवा घडावी, त्यांच्या हातून विधायक कार्य व्हावे, हा राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. “जन्माला आलो तर आयुष्य सार्थकी लागेल असे काही तरी कार्य करा. पुढील सात दिवसांत असे परिवर्तन घडवा की हे शिबिर आयुष्यभर लक्षात राहील,” असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,ज्येष्ठ सभासद व माजी सरपंच मधुकर जाधव, खतवडचे सरपंच बाळू दोबडे, उपसरपंच सुखदेव खुर्दळ, नगरसेवक सुजित मुरकुटे, ॲड. प्रदीप घोरपडे, विजय मुळाने, राजेंद्र जाधव, प्रकाश खुर्दळ, हरिसिंग माळेकर, धनंजय जाधव,संजय जाधव, श्रीमती आर.एच काथेपुरी(ग्रामविकास अधिकारी खतवड), आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यासीठावर दिंडोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम, उपप्राचार्य आर. आर. झोमन, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. धनंजय लोंढे,प्रा. प्रियंका कड, प्रा.शुभम वाघ, आयक्यूएसी समन्वयक भगत सर, सकाळ सत्र प्रमुख प्रा.गौरव सोमवंशी, बाजीराव चौधरी, समीर चौधरी, यांच्यासह खतवड गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट करत सेवा व त्याग या मूल्यांचा विद्यार्थ्यांच्या जीवनातील वाटा अधोरेखित केला.
यावेळी रमेश आबा पिंगळे(मविप्र संचालक), पत्रकार संतोष कथार, उपसरपंच सुखदेव खुर्दळ, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रोहम मॅडम, माजी उपसरपंच आर. के. जाधव आदींनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बलराम कांबळे यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि खतवड ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.