16/08/2026
१४ ऑगस्ट २०२६
डी के ए.एस.सी. महाविद्यालयात नशामुक्ती अभियानांतर्गत भित्तिपत्रिका अनावरण व व्याख्यान संपन्न...
निर्व्यसनी जगणे माणसाला दीर्घायुष्याकडे नेते – पोलीस निरीक्षक शरद नेमाने
इचल : दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथे एनसीसी विभाग व शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने 'नशामुक्ती अभियान' अंतर्गत एन सी सी कॅडेट्सनी तयार केलेल्या नशामुक्ती विषयक भित्तिपत्रिकेचे अनावरण व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नेमाने यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार युवकांमध्ये व्यसनमुक्तीची जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक शरद नेमाने म्हणाले, "तारुण्य हे अनुकरणाचे व स्वप्नपूर्तीचे वय आहे. विविध प्रलोभनांना बळी न पडता सुदृढ शरीर, सक्षम मन आणि सकारात्मक विचारांच्या बळावर शिक्षण व परिश्रमातून यशस्वी करिअर घडविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा. निर्व्यसनी तरुणाई हेच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे." अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. खाडे यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, सक्षम, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी तयार केलेल्या भित्तिपत्रिकेचे विश्लेषणही मान्यवरांसमोर सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनायक भोई यांनी केले. यावेळी निर्भया पथकाचे प्रमुख पी एस आय भोजकर, तसेच श्री असिफ सिराजभाई, स्वाती देसाई व शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी, दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, आयक्यूएसी प्रमुख डॉ. दीपक कुंभार, प्रा. प्रथमेश गवळी यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे यांनी केले, तर आभार डॉ. सुचय खोपडे यांनी मानले.