12/08/2026
*त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पाळधी येथे 'राष्ट्रीय ग्रंथालय दिन' उत्साहात साजरा!*
त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पाळधी येथे 'राष्ट्रीय ग्रंथालय दिन' अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय ग्रंथालय दिन' म्हणून पाळला जातो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख सर होते, तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मनोज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. तुषार देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ग्रंथालयाचे आणि अवांतर वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. डिजिटल युगातही पुस्तकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभारप्रदर्शन सौ. निशा भाट मॅडम यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी ग्रंथांचे मानवी जीवनातील स्थान आणि ग्रंथालयाच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकला, तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथालया तर्फे आयोजित विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.