08/02/2024
कलानिकेतनचे ६४ वे वार्षिक कला प्रदर्शन
- प्रा बाळासाहेब पाटील
कोल्हापूर येथील रा.शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाचे ६४ वे वार्षिक कलाप्रदर्शन दिनांक ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत संपन्न झाले . यावेळी हे कलाप्रदर्शन दसरा चौकातील शाहू स्मारका ऐवजी महाविद्यालयाच्या दालनात प्रदर्शित केले होते . नेहमीप्रमाणे या प्रदर्शनाची चर्चा आणि उत्सुकता कोल्हापूरच्या कला वर्तुळात होती . गेली काही वर्षे मी हे कला प्रदर्शन आवर्जून पहात आलोय . यावर्षी हे प्रदर्शन शेवटच्या दिवशी पाहण्याची संधी मिळाली .
१९५० साली चित्रकार रा. शि. गोसावी आणि चित्रकार गु. नि. सोळंकी यांनी कलानिकेतन संस्थेची स्थापना केली . १९५२ मध्ये तत्कालीन मुंबई सरकारने संस्थेस मान्यता दिली आणि १९५४ साली संस्था नोंदणीकृत झाली . संस्थेत १९५८ मध्ये ड्रॉईंग टीचर्स कोर्स ( DTC ) ( सध्याचे ATD ) तर १९५९ साली अप्लाइड आर्टचा पदविका अभ्यासक्रम सुरू झाला . ( कला संचालनालयाची स्थापना १९६५ सालची आहे ! )
एखाद्या कला महाविद्यालयाचे वार्षिक कला प्रदर्शन म्हणजे केवळ ' औपचारिकता ' असते . त्यामध्ये उत्साह कमी आणि उरकणे अधिक असते . अर्थात ; हे चित्र सर्वत्र असते असे नाही ! काही कला महाविद्यालये याला अपवाद आहेत . महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कामातील निवडक आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पहावयास मिळत असतात . विद्यार्थ्यांचा सराव , कामातील शास्त्रशुद्धता , माध्यम तंत्रावरील प्रभुत्व , महाविद्यालयाच्या अध्यापनाचा दर्जा , अभ्यासक्रमापलीकडील सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता , विद्यार्थी - अध्यापकांची सौंदर्यदृष्टी यासह प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची आणि आजमावण्याची संधी अशा प्रदर्शनातून मिळत असते .
कलानिकेतन महाविद्यालयामध्ये उपयोजित कलेचा पदविका अभ्यासक्रम ( Government Diploma in Applied Art ) , कलाशिक्षक पदविका ( Art Teachers' Diploma ) आणि एक वर्षाचा मूलभूत अभ्यासक्रम वर्ग ( Foundation Course ) आहे . पश्चिम महाराष्ट्रात उपयोजित कलेचा पदविका अभ्यासक्रम असणारे कलानिकेतन एकमेव महाविद्यालय आहे . शिवाय कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये एकमेव अनुदानित ए टी डी अभ्यासक्रम आहे .
कला प्रदर्शन म्हंटले की , सर्जनशीलता , कल्पकता आणि अभिव्यक्तीचा ' उत्सव ' असतो . माध्यम तंत्राची आणि विचारांची देवाण-घेवाण असते . भव्यता , विविधता , कलात्मकता एकाच वेळी एकाच ठिकाणी पहावयास मिळत असते . या दृष्टीने कलानिकेतनचे ६४ वे वार्षिक कला प्रदर्शन महत्त्वाचे ठरते . कलानिकेतनची ओळख उपयोजित कला आणि कलाशिक्षक पदविका या अभ्यासक्रमासाठी आहे .
वास्तविक जाहिरात कलेतील कलात्मकतेबद्दल फारसे कुठे लिहिले अथवा बोलले जात नाही . या कला प्रकारावर केवळ व्यावसायिकतेचा शिक्का मारून दुर्लक्षित केले जाते . उपयोजित कलेत अभिव्यक्ती , मानवी भावभावना , संवेदना यांना फारसे स्थान नसते असा आरोप केला जातो . मात्र या व्यावसायिक कलेतील कलात्मकता , कल्पकता , सर्जनशीलता , अभिव्यक्ती ही फाईन आर्ट प्रमाणेच अभ्यासण्याची गरज आहे . प्रदर्शनात मूलभूत अभ्यासक्रम वर्ग ( Foundation ) , कलाशिक्षक पदविका ( Art Teachers' Diploma ) , आणि उपयोजित कला ( Applied Art ) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शित केलेल्या होत्या . प्रदर्शनातील मूलभूत अभ्यासक्रम वर्गाचे वर्ग काम हे चित्रकलेचा पायाभूत व शास्त्रशुद्ध अभ्यास दर्शविणारे होते . दहावी नंतर एक वर्षाचा असणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शक असतो . केवळ माध्यमावरील प्रभुत्व म्हणजे कलाकृती नव्हे , याची जाण पहिल्याच वर्षी यायला लागते . या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केलेले वर्गकाम त्यांचे उज्वल भविष्य अधोरेखित करणारे होते .
उपयोजित कलेच्या चार वर्षाच्या अभ्यासक्रमात जाहिरात कलेच्या अनुषंगाने येणारे अनेक विषय आहेत . यामध्ये Lettering (Calligraphy / Typography) , Graphic Design , Drawing from Life , Illustration , Photography यासारखे विषय आहेत . Logo , Sign , Symbols , Tags , Shopping Bags , Label , Novelties , Gift Articles पासून Newspaper ads , Show cards , Booklets folder , Television ads , Posters , Magazine layout , Cinema slides अशा कितीतरी दैनंदिन गरजेच्या वस्तू घटकांचा आणि माध्यमांचा यामध्ये समावेश होतो . या सर्व विषयांचे कलात्मक आणि सर्जनशील नमुने प्रदर्शनात मांडले होते . संपूर्ण प्रदर्शनावर उपयोजित कलेची झाक असणे स्वाभाविक आहे . आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू हाताळत असतो . त्यावरील सुंदर अक्षरे , आकर्षक रंगसंगती , लक्षवेधी छायाचित्रे आणि यथायोग्य मांडणी याकडे फारसे डोळसपणे पहात नाही . होर्डिंग्स , वृत्तपत्रातील जाहिराती , टीव्हीवरील जाहिराती , पुस्तकांची मुखपृष्ठे , कथाचित्रे , दुकानावरील बोर्ड यासारख्या असंख्य गोष्टी करण्यामागे किती मेहनत असते , हे या प्रदर्शनातील कलाकृतीतून सहजपणे लक्षात येते .
प्रदर्शनाच्या मध्यभागी एटीडीच्या दोन्ही वर्गांचे वर्गकाम प्रदर्शित केले होते . कलाशिक्षक पदविकेचा पुनर्रचित अभ्यासक्रम असल्यामुळे या वर्गाच्या कलाकृती पाहताना कमालीची उत्सुकता होती . या वर्गाबाबत माझी वेगळीच जवळीक आहे . कलाशिक्षक पदविका अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचा मी सदस्य होतो . शिवाय कलाविश्व मध्ये या वर्गावर मी अनेक वर्षे अध्यापन केले आहे . कलानिकेतनच्या एटीडी वर्गाचे वर्गकाम हे नेहमीच अव्वल असते . प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांचे वर्गकाम प्रथमच जवळून पहात होतो . या दोन्ही वर्गांचे वर्गकाम प्रेक्षणीय होते . विशेषत: द्विमित संकल्प ( Design - 2D ) , चित्रात्मक संकल्प ( Pictorial Design ) आणि व्यक्तिरेखांकन ( Time Sketch ) लक्षवेधी होते .
प्रदर्शनात एखादा कलाप्रकार अथवा कलाकृती समजत नसेल तर संबंधित विद्यार्थी अथवा शिक्षक तत्परतेने त्याबद्दल माहिती सांगत होता . प्रदर्शनामध्ये प्राचार्य , शिक्षक , विद्यार्थी , शिक्षकेतर सेवक आणि संस्था पदाधिकारी यांचा प्रचंड उत्साह जाणवला . हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अक्षरशः सर्वांनी रात्रंदिवस मेहनत घेतली असल्याचे ऐकले . गॅलरी शिवाय एखादे कला प्रदर्शन मांडणे म्हणजे सर्कस उभी केल्यासारखे असते . प्रचंड मेहनतीचे आणि खर्चिक असते . बहुतांशी विद्यार्थ्यांना हा खर्च पेलवणारा नसतो . मात्र ज्ञात - अज्ञात व्यक्तींचा आर्थिक हातभार आणि अगम्य इच्छाशक्ती यापुढे सर्व काही विरून जाते...
दिनांक : ७ फेब्रुवारी २०२४
( हे प्रदर्शन पाहिल्यानंतर एक कलारसिक , कलाध्यापक म्हणून माझी ही व्यक्तिगत प्रतिक्रिया आहे . )