01/07/2018
सामाजिक सलोखा राखण्याचे पोलीसांचे कार्य कौतुकास्पद
- डॉ.विरेंद्रसिंग यादव
कोपरगांव : विविध भिन्न विचार सरणीत सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात.वेळोवेळी लोकांना योग्य मार्गदर्शन आणि उपक्रमांच्या माध्यमातून पोलीसांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विरेंद्रसिंग यादव यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पोलीस दलामार्फत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगांव शहर पोलीस स्टेशन आणि कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन यांचे वतीने शारीरिक स्वस्थ आणि सामाजिक सलोखा उपक्रम अंतर्गत के.जे.सोमैय्या महाविद्यालय कोपरगांव येथे व्हाँलिबाँल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ.विरेंद्रसिंग यादव,महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीपराव घोडके यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चार गटांचे रंगतदार सामने संपन्न झाले. यात पोलीस दल अधिकारी,कर्मचारी गटात शहर पोलीस संघ विजेत तर तालुका पोलीस संघ उपविजेता ठरला.खुल्या गटात संजीवनी ज्युनिअर काँलेज विजेता तर समर्थ स्पोर्टस् अँकँडमी उपविजेता संघ ठरला.
विजेता,उपविजेता संघास पोलीस दलाची विविध माहिती असणारे 'लोकराज्य' मासिक,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देण्यात आल्या.स्पर्धेचे पंच म्हणून प्रा.सुनील कुटे,प्रा.शिवराज पाळणे,प्रा.शिवप्रसाद घोडके,प्रा.चव्हाण,प्रा.मिलिंद कांबळे, बाबासाहेब गवारे,आकाश लकारे आदिंनी पाहिले.
उपस्थितांचे स्वागत कोपरगांव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी तर प्रास्तविक कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रविण लोखंडे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.कार्यक्रमास कोपरगांव शहर व ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारी,व्हाँलीबाँल खेळाडू उपस्थित होते.