20/08/2026
करिअरच्या नव्या वाटा शोधा, संधींचे आकाश खुले करा : डॉ.श्रीकांत पंड्या
लातूर, दि. 19ऑगस्ट2026 जेएसपीएम लातूर द्वारा संचलित श्रीस्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, लातूर येथे कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘कला व वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी’ या विषयावर करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.श्रीकांत पंड्या उपस्थित होते. त्यांनी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, कौशल्यविकास तसेच बदलत्या काळानुसार करिअरची योग्य दिशा कशी निवडावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य गोविंद शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या करिअर मार्गदर्शन सेमिनार्समुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअर, कौशल्य आणि भविष्यातील संधींबाबत सातत्याने विचार करण्याची सवय निर्माण होत असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू लागले असून, त्यांच्यासमोर करिअरच्या नव्या संधींचे मार्ग खुले होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मारुती सूर्यवंशी होते. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व जॉब ओरिएंटेड शिक्षण देण्यासोबतच करिअरच्या विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण संधींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. बदलत्या काळातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहून आपल्या कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य विकास लबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भविष्यासाठी नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली.
यावेळ उपप्राचार्य विठ्ठल चेवले, उपप्राचार्य मनोज गायकवाड, प्रा . सुरेश सुडे, प्रा .हणमंत बद्दे प्रा . सुधाकर दर्शने, प्रा . निवृत्ती गौंडगावे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . सुचिता घाडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.वैजनाथ जाधव प्रा सुरज सोनटक्के श्री संजय बिरादार श्री संभाजी मोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.