13/02/2026
जेएसपीएम महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग, एमआयडीसी लातूर येथे महिला सक्षमीकरण व आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न:
लातूर, जेएसपीएम महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग (MCON), एमआयडीसी लातूर येथे जेएसपीएम समूहाच्या एमआयडीसी कॅम्पसमधील सर्व कार्यरत महिलांसाठी महिला सक्षमीकरण व आर्थिक साक्षरता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महिलांमध्ये आर्थिक जागरूकता वाढवणे, आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे आणि सुजाण आर्थिक निर्णय घेण्यास प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यशाळेस श्री. हेमंत नामदेव भागवत पुणे, हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी आर्थिक नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. म्युच्युअल फंड आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) यांची सविस्तर माहिती देत नियमित गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन संपत्ती निर्माण कशी करता येते हे समजावून सांगितले. त्यांनी व्याजदर, जोखीम व्यवस्थापन, गुंतवणुकीतील विविधता (Diversification), कर बचत योजना, विमा संरक्षण, आपत्कालीन निधी आणि निवृत्ती नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनावे, असा संदेश त्यांनी दिला.
डॉ. शैलेश कचरे सर प्रशासकीय समन्वयक, एमकॉन लातूर, यांनी आर्थिक साक्षरतेचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी योग्य बजेट नियोजन, बचतीची सवय, डिजिटल बँकिंगची माहिती, आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण, महागाईचा परिणाम आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन सौ. शिरीन सॅमसन, प्राचार्या, लातूर आणि श्री. एजाज नवाज, उपप्राचार्य, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या वेळी संस्थेचे समन्वयक श्री. अनिरुद्ध पाटील सर यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या कार्यक्रम साठी स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेज चे प्राचार्य श्री. बोंडगे सर आणि स्वामी विवेकानंद इंजिनिरिंग कॉलेज चे उप प्राचार्य श्री. दयानंद हसबें सर , नर्सिंग कॉलेज चे उप प्राचार्य एजाज नवाज यांचीही कार्यक्रमास उपस्थिती होती.
या कार्यशाळेस एमकॉन तसेच जेएसपीएम एमआयडीसी कॅम्पसमधील सर्व महिला प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी ठरला.
कार्यक्रमामध्ये पीपीएफ, फिक्स्ड डिपॉझिट, पोस्ट ऑफिस बचत योजना, पेन्शन योजना तसेच महिलांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजनांबाबत प्रश्नोत्तरांचे सत्रही घेण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन प्रा.सौ. नसरिन बानो मॅडम यांनी केले तसेच त्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
ही कार्यशाळा माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरली असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखली जात आहे.