07/08/2026
*‘संस्कृता’ म्हणजे स्वतःमधील ‘सप्तशक्ती’ ओळखून त्यांचा विकास करणे : डॉ. उज्वला चक्रदेव*
‘अ जर्नी ऑफ बीइंग संस्कृता’च्या माध्यमातून विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांचा विद्यार्थिनींशी प्रेरणादायी संवाद
बल्लारपूर, दि. ७ ऑगस्ट : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर (जि. चंद्रपूर) यांच्या वतीने आयोजित ‘अ जर्नी ऑफ बीइंग संस्कृता’ हा विशेष प्रेरणादायी संवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बल्लारपूर येथील नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईच्या माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव तसेच कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव व आवार समन्वयक डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी बल्लारपूर आवाराच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेत विद्यापीठाने या परिसरात उभारलेल्या महिला शिक्षणाच्या केंद्राची भूमिका अधोरेखित केली. या भागातील मुलींना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच विद्यापीठाच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा उल्लेख करत, भविष्यातही या परिसरातील विद्यार्थिनींसाठी अधिक व्यापक शैक्षणिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी बल्लारपूर आवारातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचे विशेष कौतुक केले. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयपूर्तीत बल्लारपूर आवाराचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थिनींनी शिक्षणासोबत कौशल्य, चारित्र्य, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व आणि नेतृत्वगुण विकसित करून समाजात परिवर्तन घडविणाऱ्या सक्षम नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठ विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, ग्रामीण भागातील मुलींना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी ‘अ जर्नी ऑफ बीइंग संस्कृता’ या विषयावर अत्यंत प्रेरणादायी संवाद साधला. सुंदरता ही केवळ बाह्य रूपात नसून विचार, आचरण आणि व्यक्तिमत्त्वाच्या समृद्धीत असते, अशी सुंदरतेची नवी परिभाषा त्यांनी विद्यार्थिनींसमोर मांडली. प्रत्येकाने सर्वप्रथम स्वतःची खरी ओळख निर्माण करावी, स्वतःसोबत काही वेळ घालवत आत्मचिंतन करण्याची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे, मूल्यांची जपणूक करण्याचे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. स्वतःमधील ‘सप्तशक्ती’ ओळखून त्यांचा विकास करणे, हाच ‘संस्कृता’ होण्याचा खरा अर्थ आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वास, नेतृत्व, संवेदनशीलता, ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधण्याचा संदेश दिला.
विद्यापीठाच्या ‘संस्कृता स्त्री पराशक्ती’ या ब्रीदवाक्याशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थिनींना आत्मभान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि जीवनमूल्यांची नवी प्रेरणा मिळाली.
इंटर्नशिप व रोजगार प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार
विद्यापीठाद्वारे विद्यार्थिनींना दरवर्षी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाते. यावर्षी विविध अभ्यासक्रमांतील अनेक विद्यार्थिनींना इंटर्नशिपची संधी मिळाली असून त्यापैकी अनेक विद्यार्थिनींना नामांकित संस्थांमध्ये रोजगारही प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय कुलगुरूंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी विद्यार्थिनींच्या यशाचे उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
——————-
प्रेरणादायी नेतृत्वाचा सन्मान
कार्यक्रमाच्या निमित्ताने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांचा त्यांच्या पतीसमवेत महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर परिवाराच्या वतीने विशेष स्मृतिचिन्ह (मेमेंटो) प्रदान करून गौरव करण्यात आला. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची त्यांची दूरदृष्टी, महिला सक्षमीकरणाविषयीची दृढ बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी नेतृत्व यामुळे बल्लारपूर कॅम्पसच्या उभारणीला नवी दिशा मिळाली. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आज हा कॅम्पस विदर्भातील महिला शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होत असून, हजारो विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेचे नवे दालन खुले झाले आहे. त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष सन्मान करण्यात आला.
⸻
कार्यक्रमाचे संचालन सहायक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे व अश्विनी वाणी यांनी केले. महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूरचे उपकुलसचिव व आवार समन्वयक डॉ. बाळू राठोड यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि सर्व विद्यार्थिनींचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.