10/06/2014
पर्यावरण समृद्ध योजनेत कोकण अव्वल
TUESDAY, 10 JUNE 2014 खेड, ( प्रतिनिधी) ः
कोकण म्हणजे समृद्धी.. कोकण म्हणजेच निसर्ग जैवविविधतेने नटलेला परिसर म्हणजेच कोकण! या कोकणाला राज्य सरकारने राबवलेल्या पर्यावरण समृद्ध ग्रामयोजनेंतर्गत मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. नवे वृक्ष, नवी झाडे यांची लागवड करताना निसर्गनिर्मित पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, असे धोरण राबवून गावागावात केलेली विकासकामे हे या प्रगतीचे नवे पाऊल आहे.
कोकणातील अनेक ग्रामपंचायतींनी या योजनेंतर्गत पर्यावरण विकास पुरस्कार प्राप्त केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींना असे पुरस्कार मिळाले आहेत. यातूनच नैसर्गिकदृष्टया समृद्धी जपणारा कोकण असल्याचे सिद्ध झाले.
पर्यावरण समृद्ध ग्राम पुरस्कार योजना २०१० साली सरकारने सुरू केली. पर्यावरणाचा र्हास होऊ नये, लोकांना वृक्षारोपणासंदर्भात आवड निर्माण व्हावी आणि फलोत्पादनाचाही फायदा शेतक-यांनी व्हावा, अशा दुहेरी हेतूने ही पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अस्तित्वात आली. ज्या पद्धतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले गेले, त्याच धर्तीवर ही योजना अस्तित्वात आली.
बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती, सामुदायिक स्वयंपाकगृह, निर्धूर चुली, पशुपालन, बायोगॅस सयंत्र, कच-यापासून कोळसा कांडी तयार करण्याचा प्रयत्न जैववैविधता उद्यानांची निर्मिती आणि पावसाळ्यात पाण्याचे संकलन ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून व्यक्तिगत पातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकीकडे पर्यावरण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे लाभार्थ्यांना मिळणा-या फायद्यामुळे नैसर्गिक उत्पादनांवर ग्रामस्थांनी दिलेला भर अशा समन्वयातून ही योजना यशस्वी होत असताना पावसाळयाच्या सुरुवातीला वृक्ष लागवड करणे, या वृक्षात फळ झाडांचा समावेश असल्याने एकीकडे उजाड जमिनीवरही वृक्ष लागवड झाली तर दुसरीकडे शेतक-यांनाही त्याचा फायदा झाला.
काजू, आंबे, फणस, कोकम, नारळ, चिकू, आवळा, अशा फळ झाडांची लागवड करून या योजनेतूनही ‘कृषी ग्राम’ ही संकल्पना उदयास आणली. या सर्व कामात कोकणातील अनेक गावांनी पुढाकार घेतला आणि विकास रत्न पुरस्कारही प्राप्त केला. या पुरस्कारात जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायती अग्रेसर आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यामधून असे काम झाले असले तरी ते फारच नगण्य आहे. अमरावती जिल्ह्यातून ७, नागपूर जिल्ह्यातून ९ अशा किरकोळ ग्रामपंचायतींना विकासरत्न पुरस्कार मिळाले आहेत. पुणे आणि कोकण या पुरस्कारात आघाडीवर आहे. औरगांबाद आणि नाशिक विभागातून फक्त १० पुरस्कार मिळाले असून पुणे विभागात ४२३ पुरस्कार मिळाले असल्याची माहिती उपलब्ध आहे.
http://www.konkantoday.com/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=37&Itemid=615
KONKAN TODAY | MARATHI BREAKING NEWS