25/12/2023
पेण येथील डॉ. पतंगराव कदम आर्टस् ॲड कॉमर्स महाविद्यालयाच्या, महिला विकास कक्षाद्वारे 'सायबर क्राईम जनजागृती' या विषयावर एकदिवसीय क्षमता संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षामार्फत दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून लिंगभाव समानता आणि संवेदनशीलता वाढविण्याचा सतत प्रयत्न केला जातो. महाविद्यालयातील तरुणांमध्ये वाढत्या सायबर गुन्हेगारीबदल जागरूकता निर्मिती करणे व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित क्षमतांचा विकास साधणे या दुहेरी हेतूने या एकदिवसीय कार्यशाळेचे
दि. 22 डिसेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले..
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पेण पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रतीक पोकळे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीम. मिनल शिंदे म्हणून लाभले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रतीक पोकळे यांनी विद्यार्थ्यांना 'वाढते सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा' याविषयी मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपी अप्रत्यक्ष आणि अशिक्षित असून तो तंत्रज्ञानात तरबेज कसा असतो हे सांगून, सायबर गुन्ह्याचे स्वरूप तसेच सोशल मीडिया फसवणूक, बँकिंग फसवणूक, लॉटरी आणि नोकरी आमिष फसवणूक, मॉर्फिग, फिशिंग, ऑनलाईन शॉपिंग इ. सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांची माहिती श्री. प्रतीक पोकळे यांनी विद्यार्थयांना विविध उदाहरणांनी दिली. व्यक्तीच्या आर्थिक आणि शारीरिक सुरक्षितेसाठी सोशल मीडिया वरून येणाऱ्या विविध लिंक्स पासून आपली वैयक्तिकता कशी जपावी, हे स्पष्ट करत सायबर गुन्ह्यांपासून कोणकोणती खबरदारी घ्यावी अशा मुद्द्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीम. मिनल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना 'युवा आणि सुरक्षा' याविषयी मार्गदर्शन केले. श्रीम मिनल शिंदे यांनी पोक्सो कायदा, कलम ३५४ इ. बाबत कायदेशीर बाजू स्पष्ट करून तरुण, तरुणींना सायबर गुन्ह्यांमध्ये पोलीस साह्यता कशी प्राप्त करावी, फोटो क्लोनिंग द्वारे होणारे सायबर गुन्हे इ. माहिती देऊन विविध अॅप वापरताना कोणकोणती खबरदारी पाळावी यामुद्द्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या अंतिम सत्रामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी ऑनलाईन शॉपिंग खरेदी करताना होणारी फसवणूक कशी असते? याविषयी प्रश्न विचारत विद्यार्थांनी सायबर आणि महिला सुरक्षा याविषयी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. अस्मिता पाटील, सूत्रसंचालन डॉ. अनिल वळवी, अध्यक्षीय मनोगत डॉ. बाबासाहेब दुधाळे तर आभार डॉ. आलम शेख यांनी केले. या विशेष एकदिवसीय क्षमता संवर्धन कार्यशाळेस पोलिस कॉन्स्टेबल स्वरा पाटील, रुपाली पालवे, नवनाथ भारती आदी मान्यवर आणि महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग डॉ. श्रीकांत महादाणे, डॉ.सुनिल पवार, प्रा. लक्ष्मण. कुमारे, डॉ. बाळासाहेब सरगर, प्रा. रामहरी बागडे, प्रा.संतोष गुरव, प्रा. संजय मेघशाम, प्रा. व्ही. एम. वागटकर, प्रा.एस.एम. नायकवडी, प्रा.एम. आर. भित्रे, आदी उपस्थित होते.