19/05/2026
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांना, शंभूभक्तांना सांगावेसे वाटते... अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आपल्याला हे चित्र पाहावयास मिळाले आहे. यासाठी मातृसंस्था मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनांतील अनेक कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले, संघर्ष केला. काही वादग्रस्त विषयांबाबत भूमिका घेतली, कार्यकर्ते अडचणीत आले, परंतु कोणीही डगमगले नाही. समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिला.
या विषयावर स्वर्गीय माननीय, आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा खूप सहकार्य केले. त्यांनी त्या वेळचे तत्कालीन महापौर चंचला ताई कोद्रे यांना सूचना केल्या की संघटनांचे म्हणणे समजून घ्या व संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न करा.
तसेच अजून एका व्यक्तीचा उल्लेख करणे खूप महत्त्वाचे वाटते, ते म्हणजे आमदार अनिल बापू भोसले. अनिल बापू भोसले यांनी आपल्या आमदार निधीतून व इतर शासकीय निधीतून हे काम होण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच मागील प्रत्येक महापौरांनी सहकार्य केले. त्यामध्ये प्रशांत जगताप असतील, मा. मुरलीधर अण्णा मोहळ केंद्रीय राज्यमंत्री व माजी महापौर या नात्याने त्यांनी सुद्धा सहकार्य केले.
आज अजितदादा हयात नाहीत, परंतु दादांनी संभाजी महाराज वढू तुळापूर, पुरंदर, राजगड, सईबाई समाधी, मालोजीराजे गढी इंदापूर, सातारा संगम माहुली या ठिकाणी येसूबाई यांच्या समाधीसाठी भरघोस निधी व सर्व नियोजन करून दिले होते.
मराठा सेवा संघाच्या जागृतीमुळे आज काही प्रमाणात बदल होत आहेत आणि या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे. मागील 20 वर्षांपासून पुरंदरवर संभाजी महाराज जयंती सुरू केली. अर्धाकृती पुतळा मराठा सेवा संघाने बसविला. खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुतळ्यासाठी पुढाकार घेऊन काम केले, जयंती सुरू केली व सामुदायिक विवाह लावले. जयंतीला किल्ल्यावर व पुणे डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुरंदर येथे रॅलीने जाणे व तेथील कार्यक्रम करणे, शिवजयंती, जिजाऊ जयंती पुण्यात सुरू केली. आता या सर्वाला व्यापक स्वरूप येत आहे.
थोडीशी खंत वाटते की आपल्या लोकांनी खूप काम केले आहे, पण आता याचे श्रेय घेण्यासाठी खूप लोक पुढे येत आहेत. आपण एकच समाधान मानायचे की आपण सर्व मराठा सेवा संघाचे, संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी निर्माण केलेली पाऊलवाट आज राजमार्ग होत आहे.
आपला संघर्ष मोठा आहे. आपण संघर्षातून पुण्यात, महाराष्ट्रात शिवजयंती, शिवराज्याभिषेक, संभाजी महाराज जयंती, जिजाऊ जयंती व संभाजी महाराज राज्याभिषेक या सर्व सोहळ्यांना आता लोकोत्सवाचे स्वरूप आले आहे आणि येथून पुढे हे महोत्सव आणखी मोठे होणार आहेत.
आपण सर्वांनी मावळे, शिवभक्त, शंभूभक्तांनी सगळे विसरून एकत्र आले पाहिजे, आपल्या पुढच्या पिढ्यांना आपला हा दैदिप्यमान इतिहास सांगण्यासाठी व टिकवण्यासाठी.
काल पुणे शहरात या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण झाले. परंतु या प्रसंगी स्वर्गीय आदरणीय अजितदादांची आठवण आली आणि संपूर्ण पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा बसविण्यासाठीचा संघर्ष आठवला, तो शब्दबद्ध केला.
यात पुणे महानगरपालिका आयुक्त आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी खूप चांगले काम केले. आणि हो, सांगायला अभिमान वाटतो की यातील बहुतांश काम पुणे महानगरपालिका सद्गुरू कन्स्ट्रक्शनचे श्री. पंढरीनाथ पासलकर यांनी केले आहे. पुण्यातील लाल महाल सुद्धा आमच्या याच काकांनी बांधलेला आहे.
या मध्ये पुतळ्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना यांनी कार्य केले आहे. त्या सर्वांचे आभार व धन्यवाद.
आपला,
विकास पासलकर
प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मा. केंद्रीय निरीक्षक, मराठा सेवा संघ - संभाजी ब्रिगेड
अध्यक्ष, अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती