21/08/2021
पुण्यातलं शेतकी कॉलेज...ऐन शहरातली शेतीवाडी...
जुन्या भांबुर्डा भागाचे म्हणजे आताच्या शिवाजीनगरचे वैभव म्हणता येईल अशी संस्था म्हणजे शिवाजीनगरचे शेतकी कॉलेज... होय, तेच ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, शिवाजीनगर, पुणे. अॅग्रीकल्चर कॉलेज हा शब्द तेव्हा कोणीच वापरत नव्हते. शेतकी कॉलेज म्हणूनच ते प्रसिद्ध होते. आता युनिव्हर्सिटी रस्त्यावर असलेलं म्हसोबाचं छोटसं मंदिर तेव्हा या गेटच्या आत होतं म्हणून या गेटला जुनी लोकं म्हसोबा गेट म्हणूनच ओळखतात. म्हसोबा गेट आणि त्याला लागून शेतकी कॉलेज. लहानपणापासून या कॉलेज परिसराचा आम्हाला खूप सहवास लाभला.
भर उन्हात या मेन गेट वर उभं राहून सरळ लांबवर पाहिलं तर दोन्ही बाजूनी असलेली घनदाट, उंच झाडांनी केलेली महिरप, बरोबर मधून गेलेली सरळ, अरुंद, काळीभोर डांबरी सडक, सडकेवर पडलेला पालापाचोळा, फुलं...अगदी कोकणातल्या रस्त्याची आठवण येईल असं दृश्य.... थोडंसं आत गेलं तर पहिल्यांदा कानी पडायचा छोट्या ओढ्याचा खळखळ आवाज, आणि त्या ओढ्यावरचा एक बारीक पूल दिसायचा, आणि मग दिसायची लांबवरची कॉलेजची दगडी इमारत....ती दुतर्फा वाढलेल्या उंच झाडांची दाट सावलीची महिरप जीवाला क्षणात गारवा देऊन जायची. ( असाच झाडांचा मांडव पलीकडे रिक्रिएशन हॉल पासून पोलीस मुख्यालयला जाताना लागायचा. दोन्ही बाजूंनी वड. पिंपळ, पिंपरणी, रेन ट्रीची झाडं. कितीही लांबून प्रवास करून थकून आलो आणि घरी जाताना या मांडवाच्या नुसत्या प्रवेशद्वाराशी थोडा वेळ जरी थांबलं तरी सगळा शीण कुठल्याकुठे पळून जायचा...आईच्या कुशीत शिरत असल्याचा भास व्हायचा...आणि मग रमतगमत त्या दाट सावलीतून घराकडे चालू लागायचो...)
उन्हाळ्याच्या दिवसात कमानीच्या आत उसाचं गुऱ्हाळ चालू असायचं. त्या चरकाच्या घुंगराचा आवाज आणि कडक उन्हाने कोरडा पडलेला घसा नकळत तिकडं खेचून घ्यायचा. याच परिसरात आमचं बालपण गेलेलं. तेव्हा साधारण रविवारी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत हमखास शेतकी कॉलेज मध्ये खेळायला, भटकायला जायचो. बरोबर दहा बारा मित्र असायचेच. सुट्टीत तिथं फिरताना, खेळताना झाडावरून पडलेल्या वितभर लांबीच्या, बोटभर रुंदीच्या तपकिरी काळ्या शेंगा गोळा करायच्या. तिथंच बसून त्या शेंगा दगडाने फोडायच्या, त्यातल्या बिया काढून टाकायच्या. उरलेल्या शेंगा दगडाने कुटून अजून बारीक करायच्या. कि त्याचा जाम चिकट लगदा व्हायचा. मग त्या चिकट लगद्यापासून छोटा हाडक्या, गोट्या खेळताना वापरतात तसला करायचा किंवा बॉल तयार करायचा. कुठूनतरी नारळाच्या झावळ्या मिळवून त्या छाटल्या कि त्याचं फावडं उरायचं. हि आमची त्यावेळची हॉकी. मग त्या बॉलने हॉकीचा खेळ सुरु व्हायचा.
काहीजण या शेंगा पोतं पोतं भरून साठवायचे. त्या वेळी घरोघरी बंब असायचे. या शेंगा बंबात चांगल्या जळायच्या. हि येणाऱ्या पावसाळ्याची तयारी असायची. न वेचल्या गेलेल्या, रस्त्यावर पडलेल्या शेंगा गाड्यांच्या चाकाखाली चिरडून सगळ्या रस्त्याला चिकटलेल्या असायच्या. अशा शेंगाची झाडं आता जास्त कुठं दिसत नाहीत. असंच एक विस्मृतीत गेलेलं रोप म्हणजे रीबीची झाडं. कमरेईतकी वाढणारी हि दाट पानांची रोपं पूर्वी कुंपणाला हमखास लावलेली असायची. त्याला पांढरी लांब दांड्याची फुलं यायची. ती फुलं देठापासून खुडली आणि त्याचा नाजूक दांडा चोखला तर त्यातून मधासारखा गोड द्रव झिरपायचा.. भारी चव होती त्याची. हि रीबीची झाडंपण आता कुठं दिसत नाहीत. ( जाणकारांनी प्रकाश टाकावा.)
या मेन गेटच्या समोर आताच्या एसबीआय च्या दारात एक भलं मोठं वडाचं झाड होतं. त्याच्या सावलीत एका भेळवाल्या भैय्याची गाडी लागायची. डोक्यावर अर्धवट मावणारी गांधी टोपी, पांढरा नेहरूशर्ट धोतर, गळ्यात लाल पांढरा गमछा, झुपकेदार मिशा आणि कायम हिंदीत नाहीतर मोडक्या तोडक्या मराठीत बोलायचा. त्याच्याकडे सुकी भेळ मिळायची. छोटे छोटे तेलातले बुंदीचे लाडू, जिलबी आणि शेव रेवडी हि त्याची खासियत होती.
गेट मधून आत त्याच लांबलचक सरळ रस्त्याने पुढे आलं कि मुख्य चौकाच्या उजव्या हाताला फुटबॉलचं भलं मोठं मैदान आहे. इथं बऱ्याच मॅचेस बघितलेल्या आठवतात. त्याला लागुनच एक छोटं चित्रात शोभेल असं जिम, बॅडमिंटन हॉल आणि स्टेडियम देखील आहे. तिथं जरा उड्याबिड्या मारून मग मुख्य बिल्डींगकडे जायचं. मधोमध गोलाकार हिरवळीवर महात्मा फुलेंचा अर्धाकृती पुतळा आहे. छोट्या तारेच्या कंपाऊंडवरून आत उड्या मारून जायचो आणि पुतळ्याला आदर दाखवायला आम्ही चक्क सॅल्युट ठोकायचो. पोलीस लायनीतले संस्कार...
या मेन बिल्डिंगला तीन रस्ते येऊन मिळायचे. एक मेन गेट वरून येणारा. दुसरा डावीकडे जाणारा खैरेवाडीचा रस्ता. या रस्त्याला भरपूर चिंचेची झाडं आहेत. फक्त खाली पडलेल्या चिंचा गोळा केल्या तरी पिशवी भरून जायची. या रस्त्याला मोठमोठी कौलारू बैठ्या बंगल्यासारखी ऑफिसेस आहेत. त्या गेटने बाहेर पडले कि खैरेवाडी किंवा जुने प्रेमनगर नावाची वस्ती लागायची. म्हसोबा देवाची यात्रा अक्षय्य तृतीयेला भरायची. त्या आधी तिथे आठ दिवस आजूबाजूची बायाबापडी येऊन कोंबड्याचा नैवेद्य करायची. त्याच आवारात कोंबडी कापली जायची. नैवेद्य, प्रसाद...आठ दिवस नुसती धमाल असायची. आणि मग शेवटच्या दिवशी म्हसोबाची पालखी निघायची. छबिना म्हणायचे त्याला. मंदिरापासून ते या दुसऱ्या गेटच्या बाहेरील प्रेमनगर पर्यंत छबिना मिरवत नेला जायचा. ढोल लेझीमचा खेळ व्हायचा. मग तिथे कनातीत तमाशाचा खेळ असायचा. रात्रभर तमाशा चालायचा. वडिलांबरोबर बऱ्याचवेळेला गेलेलो आठवतंय अजून.
तिसरा रस्ता उजवीकडचा...नरवीर तानाजी वाडी उर्फ वाकडेवाडीत जाणारा. एन.सी.सी ऑफिस, पोरांची होस्टेल्स, कॅंटीन याच बाजूला आहेत. या गेटने बाहेर पडलं कि आता नवीन झालेला भुयारी मार्ग लागतो...
मुख्य बिल्डींग संपूर्ण दगडी असून त्यावरचा मोठा घुमट खरंच वास्तुकलेचा नमुना आहे. इमारतीतील मोठमोठे पोर्च, भलेमोठे वर्ग, लाकडी जिने, कमानी, सारं काही बघण्यासारखं....पण आमच्यासाठी खरी धमाल असायची ती मुख्य बिल्डींगच्या मागे. डाव्या हाताने थोडं पुढे गेले की छोटंसं गेट लागायचे. गेटच्या आत शिरलो कि तिथल्या गोठ्यातला शेणामुताचा वास नाकात भरायचा. त्या वासाने धुंद व्हायला व्हायचं. कारण सहावी सातवीला असताना घरातली जमीन आणि अंगण सारवायला शेण गोळा करायला सायकलला बादली लावून भल्या पहाटे अंधारात भरपूर हिंडलेलो. तेव्हा थंडीच्या दिवसात चौकातल्या शेळकेच्या गोठ्यातला हा वास अजून नाकात बसलेला आहे. तसाच इथलाही गोठा. या गोठ्यात दहाबारा जनावरं बांधलेली असायची. बाजूला एखादुसरा ट्रॅक्टर उभा असायचा. तो गोठा ओलांडून पुढं गेलं कि अहाहा...सगळाच नजारा बदलून गेलेला असायचा... आता आपण पुणे शहरातल्या एका गजबजलेल्या भागात आहोत हे विसरायला व्हायचं आणि कुण्या आप्ताच्या गावी, शेतावर आल्याचा भास व्हायचा. क्षणात घर-दार-शाळा विसरून जायचो आणि आम्हीं मुक्त, स्वच्छंद हिंडणारी खेड्यातली पोरं व्हायचो. नजर पोचणार नाही तिथपर्यंत चहुबाजूनी शेती, कुठं उस लावलेला, कधी गव्हाची किंवा ज्वारीची पिकं शेतात उभी असायची. क्वचित कोलेजातली पोरं घोळक्याने कामं करत असायची. लांबवर उजव्या हाताला रेल्वे लाईन दिसायची. मध्येच कधीतरी रेल्वेचा धडाकधडाक धडाकधडाक आवाज यायचा, शिट्टी वाजायची आणि मग हिरव्यागार शेताच्या पार्श्वभूमीवर लांबून पळणाऱ्या रेल्वेगाडीकडे भारावल्यासारखं बघत बसायचो. कधीकधी उगीच आरडा ओरडा करायचो, शिट्ट्या मारायचो. हळू हळू मग रेल्वेगाडी दूर दिसेनाशी व्हायची. तिथून उजव्या हाताला चालू लागायचं...कधी मधल्या मोठ्या मातीच्या रस्त्याने , तर कधी शेतातून किंवा नांगरटीतून... होस्टेलच्या इमारती मागे टाकून मारुती मंदिराकडे जायचं. गावात असत तसं छोटसं मारूतीचं मंदिर, मारुतीच्या मूर्तीच्या मागे खिडकीला लागून भली मोठी विहीर...आवारातच मोठ्ठ औदुंबराचं झाड...त्याला लागुनच एक भली मोठी विहीर होती. तिच्यावरची मोटर सतत चालू असायची. आमच्यातले काही उत्साही मोठी मुलं पोहायला उतरायचे विहिरीत. बराच वेळ पोहणं चालायचं. मंदिरात कोणी अभ्यास करत बसलेलं असायचं तर कुणी झोप काढत असायचं. मंदिराच्या थोडं पुढे तिथल्या कामगारांची बैठी घरं होती....
डावीकडे येऊन परत शेतातल्या मुख्य रस्त्याला लागलं कि परत शेती लागायची. भलं मोठं क्षेत्र. तिथं एक मचाणासारखा भाग होता. वाडीतली पोरं तिथं अभ्यास करत बसायची. आत छोटासा ओढा. तो पार करून आणखी पुढं गेलं कि माळरान ओलांडल्यावर डायरेक्ट तुम्ही रेंजहिल्सला निघायचे. सायकलवरून या मार्गे कितीतरी वेळा खडकीला गेलेलो आठवतंय....
संपूर्ण रानात ठिकठिकाणी आंबा, पेरू, जांभळ, चिंच, आवळे, सीताफळाची बागा...हटकणारे शक्यतो कुणी नसायचे. मग काय विचारता! सगळ्या पोरांचे खिसे चिंचा, आवळ्यांनी टम्म फुगलेले असायचे...चालून दमलो तर कुठल्यातरी झाडाखाली टेकायचं. मनसोक्त गार वारं खात उन्हाच्या माऱ्याला परतून लावायचं.
मेन गेटच्या बाहेर कौलारू छोटी मंडई होती. तिथे भाजीपाला व फळे विक्री व्हायची. इथल्याच शेतात पिकलेल्या पालेभाज्या, गवार, दोडका, कारली कधीमधी फळं पण असायची विक्रीला. सगळी विक्री किलोमध्ये व्हायची. ताजा स्वच्छ आणि रसरशीत भाजीपाला... तासाभरात संपून जायचा...मग कधीतरी ते कौलारू भाजीविक्री केंद्र बंद पडलं आणि तिथंच उसाचं गुऱ्हाळ चालू झालं. इथल्या रसाची चव वेगळीच होती, अतिशय घट्ट आणि काळपट रस असायचा. पहिल्यांदा कुपन घ्यावं लागायचं. जम्बो ग्लास पहिल्यांदा इथंच बघितला. उन्हाळ्यात घरी पाहुणे आले तर स्टीलच्या किटलीत रस भरून घेऊन, बर्फाचे एक्स्ट्रा पैसे देऊन सायकलवरून घरी घेऊन येण्यात वेगळीच मजा असायची. अलीकडे गुऱ्हाळ सुद्धा चालू दिसलं नाही बरेच दिवसात...
थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच व्यायामाची हुक्की यायची. तेव्हा पोलीस ग्राउंड सकाळी फूल्ल भरलेलं असायचं. त्यात पोलीस भरतीसाठी, पीएसआय साठी प्रयत्न करणारी पोलीस लाईनमधली भरपूर मुले असायची. मग दुसरा जवळचा चांगला पर्याय म्हणजे शेतकी कॉलेजमध्ये रनिंगला जाणे. थंडीच्या दिवसात तिथं पहाटे अंधारात पळताना, फिरताना खूप थंडी वाजायची. नंतर जसजसं उजाडायला लागायचं तसतसे उंच उंच दाट झाडातून सूर्यकिरण जमिनीवर पोहोचायची. ते दृश्य कधीच न विसरता येण्यासारखं...
आता शेतकी कॉलेज बरचसं बदललंय. मेन गेट ला सिक्युरिटी वाढवलीय. सहजासहजी आत प्रवेश देत नाहीत. ईतर दोन गेट कायमची बंद करून टाकलीत. मध्यंतरी बरीच वर्षे मेन बिल्डींगच्या आवारात आमच्या हास्यक्लबची शाखा भरायची. सकाळी 6 ते 7. मॉडेल कॉलनी भागातून बरेसचे लोक सकाळ संध्याकाळ नियमितपणे फिरायला येतात. फिरण्यासाठी याच्यासारखा नैसर्गिक ट्रॅक पुण्यात कोठेच नसेल. मेन गेटवरून सुरुवात करून तिन्ही गेटला शिवून परत मेन गेटला आलं कि बरोबर ३ किमीचा राउंड व्हायचा. आता झालेत जॉगिंग ट्रॅक पण याची सर कुठल्याच कृत्रिम ट्रॅकला येणार नाही. हिरव्याकंच झाडीत सिमेंट ठोकळ्याचे ट्रॅक नजरेला सुखावत नाही...
शांत परिसर आणि इथली नैसर्गिक हवा त्यामुळे ऐन शहरात असलेल्या एवढ्या मोठ्या शेती क्षेत्राचे वेगवेगळ्या कारणास्तव चहुबाजूनी लचके तोडायचे प्रयत्न होतायत. या शेतकी कॉलेजची बरीचशी जागा ही आदरणीय शिरोळे (पाटील) कुटुंबियांकडून शासनाने अधिग्रहित केली होती. वाढत्या कारभारामुळे कॉलेजच्या आवारात आता मोठमोठ्या इमारती झाल्यात. वास्तुरचनेत जुन्या इमारतीशी साधर्म्य दाखवणाऱ्या पण त्या वातावरणाला न शोभणाऱ्या नवीन इमारती. रेल्वे लाईन लगतची खूप मोठी जागा मेट्रोला दिलीय. पलीकडे काही सोसायट्या आतपर्यंत घुसल्यात. साखर कारखानदारीच्या सुबत्तेचं प्रतिनिधित्व करणारी साखर संकुल म्हणून एक भव्य, आधुनिक landscape ची इमारत आणि साखर आयुक्तांचा टुमदार बंगला शेतकी कॉलेजाच्याच एका तुकड्यावर उभा आहे. रेंजहिल्स एन्डला जरबेरा, कार्नेशन वगैरे फुलांचा हायटेक प्रकल्प उभा राह्यलाय. अगदी मागचे मैदान आता मोठ्या प्रदर्शनासाठीचा हॉटस्पॉट झालाय. मध्यंतरी मुन्नाभाई एमबीबीएस, दुनियादारी अशा दोनचार चित्रपटांचे शूटिंग इथं पाहण्याचा योग आला. दुनियादारीचा सेट तर महिनाभर होता...एक दोनदा निवडणूक कामासाठी इथल्याच मैदानावर साहित्य देण्याघेण्यासाठी गोळा झालो होतो. त्याच आवारात मिटकॉन, जिल्हा उद्योग केंद्र तसेच हातकागद संस्था उभ्या आहेत.
अजूनही कधी इथं जाणं झालं कि काळाचा पडदा झर्रकन बाजूला होतो आणि पलीकडच्या पोलीस लाईनमध्ये राहत असताना इथे व्यतीत केलेल्या क्षणांचा साक्षात्कार घडतो. तेव्हाचे हे निसर्गात हिंडण्या फिरण्याचे, झाडांच्या संगतीत, शेतामध्ये रमायचे अनुभव घेतलेल्यांना आताची कॉंन्क्रीटची जंगलं बघवत नाहीत. त्यावेळेस चहुबाजूला पसरलेला निसर्ग माणसाला खरंच भरून पावलो म्हणायची संधी वारंवार देत होता...जी आता क्वचितच मिळते...
कोणास ठाऊक हि जागा, हि इमारत, हि शेती भविष्यात कोणाच्या ताब्यात जाईल...तोपर्यंत जमेल तेव्हा इथे फेरफटका मारतो आणि खेड्यातला वातावरणाचा आणि शेतातल्या मातीचा वास छाती भरून घेतो, आणि परत जगरहाटी कडे वळतो...