23/12/2014
किल्ले लोहगड आणि विसापूर येथे २८ डिसेंबरला फोर्ट मॅरेथॉन
पुणे येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेमार्फत दिवंगत गिर्यारोहक कै. रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ R-MARC the Fort Marathon या स्पर्धेचं (रविवार) २८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष असून हि स्पर्धा लोणावळ्याजवळील लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांचा परिसरात होणार आहे.
लोहगड – विसापूर किल्ल्याच्या पायथ्यापासून रविवारी सकाळी सात वाजता स्पर्धेस सुरवात होईल. स्पर्धा खुला गट (Open) आणि हौशी गट (Amature) अशा दोन मुख्य गटात भरवली जाणार असून त्यामध्ये All Men व Mix असे दोन उपगट असतील. खुल्या गटातील स्पर्धकांना २० किलोमीटर्स तर गटातील स्पर्धकांना १६ किलोमीटर्सचं अंतर कापावे लागणार आहे. प्रत्येक संघात दोन सदस्य असतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास नकाशे दिली जाणार आहेत, आणि त्या आधारे त्यांना स्पर्धा पूर्ण करायची आहे. स्पर्धा मार्गावर एकूण ६ तपासणी नाकी (Check Post) असणार आहेत. प्रत्येक नाक्यावर स्पर्धकांना वेळेसाठी नाव नोंदवावा लागणार आहे.
या स्पर्धेसाठी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी “शोध व बचाव पथक”, भरारी पथक, डॉक्टर आणि रुग्णवाहिकाही स्पर्धेच्या ठिकाणी असणार आहेत.
खुल्या (Open) गटातील विजेत्या संघाना अनुक्रमे दहा, सात आणि पाच हजार रुपयांचा प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस व चषक तर हौशी (Amature) गटातील विजेत्या संघाना अनुक्रमे सात, पाच आणि तीन हजार रुपयांचा प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस व चषकं दिली जाणार आहेत. याखेरीज स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत दिले जाणार आहे.
या स्पर्धेच्या नोंदनीसाठी आणि अधिक माहितीसाठी संजय गवळी (8087628656/9850413152), सुधीर निगडे (8087427523) यांच्याशी संपर्क साधावा.
सागरमाथा संस्थेचे संस्थापक रमेश गुळवे यांचा २०१२ मध्ये माउंट एवरेस्ट मोहिमेदरम्यान मृत्यू झाला होता. कै. रमेश गुळवे यांनी नोव्हेंबर २००७ मध्ये ३ दिवसात २३ किल्ले सर केले होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी त्या किल्ल्यांपैकी एका किल्ल्यावर संस्थेमार्फत हि स्पर्धा भरवण्यात येते. मागील वर्षी किल्ले राजमाची येथे हि स्पर्धा भरवली गेली होती. त्यामध्ये एकूण ५४ संघ सहभागी झाले होते.
अधिक माहितीसाठी संपर्कः
कुशल देशमुख - 9823132314
सागरमाथा गिर्यारोहण संस्था, भोसरी, पुणे.
http://sagarmathags.com/rmarc