24/10/2024
*दिवाळी १० वी १२ वी ची*
माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार,
वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी जवळ आली आहे. आपल्या आजूबाजूला उत्साहाचं वातावरण आहे. आणि आपले महत्वाचे शैक्षणिक वर्ष देखील सुरु झाले आहे. काय करावे? मस्त दिवाळीचा आनंद लुटू ? का अभ्यासाच्या मागे लागू या विवंचनेत आपण सगळे असणार. इथे आपण एक मुख्य गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे दिवाळी दरवर्षी येते पण *१० वी/१२वी ची परीक्षा एकदाच येते.* तेव्हा दिवाळी पुढच्या वर्षी दुप्पट जोमाने साजरी करता येईल. सध्या अभ्यासाकडे नीट लक्ष देणे जास्त गरजेचे आहे.
मग पुढचा प्रश्न पडतो तो म्हणजे अभ्यास कसा करायचा? तर आत्ताच आपली सहामाही परीक्षा झालेली आहे. त्यात कमीतकमी प्रत्येक विषयाचा निम्मा पोर्शन तर नक्की होता. त्याचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे कोणत्या धड्यांची तयारी आपली उत्तम झालेली आहे आणि कोणते धडे अजून अभ्यासायला हवेत. आपण गणिते नीट सोडवू शकतो का नाही, लिखाणाचा वेग पुरेसा आहे का कमी पडतो या आणि अशा अनेक गोष्टींचा अंदाज या परीक्षेनंतर आपल्याला आलेला असेल. यातल्या कोणत्याही गोष्टीत किंवा सर्वच गोष्टीत जरी तुम्ही कमी पडत असाल तरी निराश होण्याचं, घाबरून जाण्याचं कारण नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आगामी काळात आपल्या तयारीतील त्रुटी लक्षात घेऊन त्या कमी करायचा प्रामाणिक आणि जोरदार प्रयत्न केलात तर त्यावर मात करणे शक्य होईल.
एक लक्षात घ्या की दिवाळीची सुट्टी २१ दिवस आहे. सुट्टी सुरु व्हायच्या आदल्या दिवशी आपल्या तयारीतील त्रुटी शोधून काढून त्या एका कागदावर लिहून काढा. त्या दूर करण्यासाठी करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करा. वेळेचे नियोजन करा. आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. या कामी तुमचे पालक आणि शिक्षक यांची पण मदत घ्या. या सुट्टीत तुम्हाला कॉलेज / शाळा नसेल. त्यामुळे तुम्हाला थोडा जास्त वेळ उपलब्ध असेल. २४ तासातले काही दिवाळी साजरी करण्याचे आणि मजेचे ४ तास आणि झोपेचे ७ तास सोडले तरी आपल्या हातात १३ तास शिल्लक आहेत. त्याचे नीट नियोजन करून अभ्यास केलात तरी २१ दिवसाचे २७३ तास मिळतील. त्याचा सुयोग्य वापर करून झालेले धडे इतके पक्के करा की झोपेतून उठवून कोणताही प्रश्न विचारला तरी सहज सोडवता येईल. आपल्या आजूबाजूच्या कॉलेज/ शाळे मधील मित्रांचे सहामाहीचे पेपर सुद्धा तुम्ही सराव म्हणून सोडवू शकता. सुट्टी संपताना कोणतेही काम pending राहिलेले नाही अशी वेळ आणा, म्हणजे पुढच्या गोष्टी नीट शिकता येतील आणि तयार करता येतील.
एक ठरवा. आत्ता फटाके कमी उडवलेत तर तुमचे यश पाहून तुमच्या साठी इतर लोकं फटाके उडवतील. उत्तम अभ्यास केलात तर आपल्याला भविष्यात नक्कीच उज्वल यश मिळेल यात शंका नाही. दिवाळीचा आनंद आणि सुट्टीतील अभ्यासाचा आनंद, दोन्हीसाठी शुभेच्छा.
*©ज्ञानेश वैद्य*
संचालक
*ज्ञानभास्कर सायन्स क्लासेस (7387627877)*