17/08/2026
रोबोटिक्सच्या सहाय्याने शत्रुंजयमध्ये अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा 🇮🇳🤖
सांगली : १९९७ पासून संगणक, फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाईन आदी विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या शत्रुंजय संस्थेत यंदाचा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहण न करता रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. 🇮🇳
महाराष्ट्रभरातील विविध शाळांमध्ये शत्रुंजयमार्फत एआय (AI) आणि रोबोटिक्सचे प्रशिक्षण दिले जाते. याच तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग विद्यार्थ्यांना दाखविण्याच्या उद्देशाने रोबोटिक्सच्या सहाय्याने ध्वजारोहणाचा उपक्रम राबविण्यात आला. तासगाव येथील सिव्हिल इंजिनिअर श्री. गणेश चव्हाण यांच्या हस्ते बटन दाबून रोबोटिक यंत्रणेच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रध्वज वर घेण्यात आला. 🇮🇳🤖
“Idea, Innovation आणि Implementation” या धोरणावर शत्रुंजय संस्था सातत्याने कार्यरत आहे. दैनंदिन जीवनातील विविध कामे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कशी करता येऊ शकतात, याचा अनुभव विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासूनच मिळावा, या उद्देशाने संस्थेमार्फत एआय आणि रोबोटिक्सचे प्रशिक्षण दिले जात आहे.
शत्रूंजय ग्रुपचे प्रमुख श्री स्वप्निल शहा यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम शत्रुंजय रोबोटिक्स चे तंत्रज्ञान प्रमुख श्री भाविन पालेजा यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्विजय मंडलिक व कौमुदी खेटमार यांनी केले.
या अनोख्या ध्वजारोहणाच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान, नवकल्पना आणि देशभक्ती यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमास शत्रुंजय संस्थेतील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील शिक्षक श्री. संजीव जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार केंद्रप्रमुख सौ. सुप्रिया कोष्टी यांनी मानले.
रोबोटिक्सच्या माध्यमातून राष्ट्रध्वज फडकवून साजरा करण्यात आलेला हा अनोखा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. 🇮🇳