07/06/2025
भोसले नॉलेज सिटीचा अकरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा.....
एका शैक्षणिक वाटचालीचा यशस्वी प्रवास.....
भोसले नॉलेज सिटीचा अकरावा वर्धापन दिन आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मागील अकरा वर्षांतील संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. सकाळच्या सत्रात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रोक्त मंत्रोच्चार व टाळ मृदुंगाच्या जयघोषामुळे वातावरण चैतन्यमय बनले होते. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संध्याकाळच्या सत्रात कर्मचाऱ्यांचे मनोगत व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ डी फार्मसी, सीबीएसई स्कूल आदी संस्थांचे प्राचार्य आणि कर्मचारी यांनी स्वतःचे अनुभव व आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका प्रियांका देसाई उपस्थित होते.
सचिव संजीव देसाई आणि कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी उपस्थितांना संबोधित करताना आजवरच्या प्रवासातील संस्मरणीय क्षण आणि भविष्यातील उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असून आगामी काळात अजून दर्जेदार सोयीसुविधा पुरविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमर प्रभू यांनी केले.